पीएच.डी.धारकांमध्ये भारत जगात चौथ्या क्रमांकावर

विविध विषयांत संशोधन करून पीएच.डी. पदवी मिळविणार्‍या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. आर्थिक सहयोग व विकास संस्था (ओईसीडी) या संस्थेने ही क्रमवारी जाहीर केली आहे. पीएच.डी. पदवी मिळविणार्‍या देशात अमेरिका पहिल्या स्थानावर आहे.

आर्थिक सहयोग व विकास संस्थेने 2014 साली पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या एकूण संशोधकांच्या संख्येनुसार रँकिंग जाहीर केली आहे. या अहवालानुसार जगातील 15 देश हे पीएच.डी. पदवीधारकांच्या संख्येत आघाडीवर आहेत. क्रमवारीनुसार पाचव्या स्थानी जपान, यानंतर फ्रान्स, दक्षिण कोरिया, स्पेन, इटली, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, तुर्की, इंडोनेशिया, रशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांचा समावेश आहे.

भारतात 2014 मध्ये 24,300 पीएच.डी. पदवीधारक

सन 2014 या वर्षात भारतात सर्व विषयातील मिळून पीएच.डी. पदवी प्राप्त करणार्‍यांची संख्या ही 24,300 इतकी असून जागतिक क्रमवारीत भारत चौथ्या स्थानावर आहे. याच काळात अमेरिकेत 67,449 जणांनी पीएच.डी. मिळविली असून, अमेरिका पहिल्या स्थानावर आहे तर जर्मनीने 28,147 पीएच.डी. पदवी प्राप्त करून जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकाविले आहे, तर इंग्लंड ने 25,020 पीएच.डी. पदवीधारकासह जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान मिळविले आहे.

इंग्लंड आणि भारत या देशात पीएच.डी. धारकांच्या संख्येत फार मोठा फरक नाही हे लक्षात घेतले पाहिजे. पीएच.डी. पदवी प्राप्त करणार्‍या देशात भारत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असला तरी, उभारत्या आर्थिक देशात भारताचा क्रमांक अव्वल ठरला आहे. जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स यासारख्या देशांना पीएच.डी. पदवीधर संख्येत मागे टाकले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*