सरसेनापती उमाबाई दाभाड्यांचे अभोणा

सरसेनापती उमाबाई दाभाड्यांचे अभोणा
रमेश पडवळ
Ramesh.padwal@timesgorup.comभारताचा इतिहास अनेक लढवय्या रणरागिणींनी उजळून निघालेला आहे. यात झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, ताराराणी भोसले अशी अनेक नावे घेता येतील. यात एक वेगळे नाव म्हणजे पेशवाईतील सरसेनापती श्रीमंत उमाबाई खंडेराव दाभाडे. पेशवाईतील हा वेगळा पैलू अनेकदा नजरेआड झालेला दिसतो. मात्र पेशवाईतील हे एक वास्तव एक नव्या रणरागिणीची वेगळी ओळख करून देते. उमाबाईंचा आणि नाशिकचा संबंध काय हे पाहण्यासाठी सरदार दाभाड्यांची कारर्कीद जाणून घेणे गरजेचे आहे. छत्रपतींच्या गादीची धुरा सांभाळणाऱ्या पेशवाईने इतिहासाला एक वेगळाच आयाम दिला. तसेच पेशवाईला शौर्याचा रंग देण्यात त्यावेळच्या पराक्रमी सरदारांचे महत्त्वही तेवढेच आहे. छत्रपतींसाठी अन्‌ पेशव्यांच्या आदेशावर जीव ओवाळून टाकणा-या अनेक सरदारांच्या पराक्रमाने मराठेशाहीचा इतिहास उजळून निघाला आहे. यात महाराष्ट्रातील सतराव्या शतकातील एक प्रसिद्ध मराठा घराणे म्हणजे पुण्यातील तळेगावचे दाभाडे घराणे. या घराण्याचा मूळ पुरूष बजाजी व त्यांचा मुलगा येसाजी हे शिवाजी महाराजांचा पदरी होते. छत्रपतींनंतर संभाजी राजांनीही त्यांना रायगडाची धुरा दिली. संभाजीनंतर ते राजारामांच्या सेवेत दाखल झाले. येसाजींना खंडेराव आणि शिवाजी ही दोन मुले होती. तर खंडेरावांना त्रिंबकराव व यशवंतराव ही दोन मुले होती. खंडेराव पराक्रमी निघाले. त्यांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या. शाहू महाराजांनी खंडेरावांना सेनाखासखेल अन्‌ नंतर १७१७ मध्ये सेनापतीपदी नेमले. खंडेराव दाभाडेंनी उत्तर सरहद्दीवर राहून खानदेश, वऱ्हाड व गुजरात या तीनही प्रांतावर आपली पकड घट्ट केली. खंडेरावाच्या मृत्यूनंतर शाहूने त्रिंबकरावास सेनापतिपद दिले. अंतर्गत वादातून झालेल्या डभईच्या लढाईत बाजीराव पेशव्यांकडून त्रिंबकराव मारले गेले अन्‌ येथूनच खंडेरावांची पत्नी अन्‌ त्रिंबकरावांची आई उमाबाईंचा पेशव्यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. शाहूंनी बाजीरावांसह तळेगावात जाऊन उमाबाईंची समजूत काढून त्रिंबकरावाचा भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपदाची वस्त्रे दिली. यशवंतराव अल्पवयीन असल्याने सरसेनापतिपदाचा कारभार उमाबाई पाहू लागल्या अन्‌ त्या पेशवाईतील पहिल्या महिला सरसेनापती झाल्या. उमाबाई या अभोण्याच्या ठोके घराण्यातील कन्यारत्न. त्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा शोधत अभोण्यात पोहचलो अन्‌ थक्क करणारे वास्तव डोळ्यापुढे तरळले.

नाशिकहून सप्तश्रृंगीगडाकडे जाणाऱ्या रस्त्याने नांदुरी गाव आले की, तेथून अभोणा गावाकडे जाणारा रस्ता लागतो. या फाट्यावर उजव्या हाताला एका झाडाखाली आदिवासींची चिरे अन्‌ एका भग्न गणेशमूर्तीसह अनेक देवतांचे भग्न अवशेष ठेवलेले दिसतात. ते पाहून पाच किलोमीटवर असलेल्या अभोण्याकडे जाताना मध्येच मोहनदरी फाटा लागतो. फाट्यावर आदिवासींचे लाकडी चिरे पहायला मिळतात. ते पाहून आपण एका ऐतिहासिक मराठा सरदाराच्या गावात जात आहोत याची उजळणी मनात सुरू होते. गिरणा नदीच्या काठावर वसलेले अभोणा ही एक प्रसिद्ध बाजारपेठ असल्याने पहिल्यापासूनच हे वर्दळीच ठिकाण. आता एखाद्या विकसित शहरासारखं रुप घेऊ लागलं आहे. पण गिरणापात्रात मधोमध असलेली एक प्राचीन वास्तू या विकासापासून आपल्याला लांब घेऊन जाते अन्‌ अभोण्याच्या इतिहासात हरवून टाकते. ठोके-देशमुख या अभोण्यातील सरदार घराण्याची शान गिरणाच्या पुरामुळे उद्धवस्त झालेल्या वास्तूतून पहायला मिळते. हत्ती, घोडे बांधण्याची व्यवस्था, देवांच्या देवळ्याचा एक चौथरा आज येथे शिल्लक आहे. त्यात विविध देवांच्या मूर्तीही मनमोहक आहेत. पूर्वी निवांत अन् एकांतात पहुडण्यासाठी ही जागा खास बनवली गेली असणार तीही नदीपात्राच्या मधोमध. या वास्तूच्या फक्त शिल्लक असलेल्या चौथऱ्याला न्याहाळताना समोरच्या टेकडीवरील गढीकडे लक्ष जातं. गढी आता जमीनदोस्त झाली आहे पण गढीचा बुलंद दरवाजा मात्र अजूनही इतिहास उभा करतो. नक्षीकाम, विविध शिल्पे अन्‌ हरवलेल्या इतिहासाला कवटाळून बसलेला हा दरवाजा अभोण्याची शान जपताना दिसतो. या वास्तूकडे जाण्यासाठी घाणीच्या साम्राज्यामुळे थोडी कसरत करावी लागते. पण हा दरवाजा पाहताना गढी (महाल) किती मोठी असेल याची प्रचिती येते. गढीच्या भिंतीचा आकार बरेच काही सांगतो. हा अभोण्याचा ऐतिहासिक वारसा असल्याने ही वास्तू कायमस्वरूपी जपण्याची गरज मनाशी भिडते. पेशवेदप्तरातील ठोके घराण्याच्या कागपत्रांवरून या घराण्याचे पेठ संस्थानचे लक्षधीर राजे, बाजी आटोळे, सिन्नरचे देशमुख, कुंवर बहाद्दर, मुदोनकर भावसिंग ठोके यांच्याशी आप्त संबंध असल्याचे दिसते. अभोण्याचे देवराव व हरिसिंग ठोके हे दोन सरदार तळेगाव दाभाडेच्या खंडेराव दाभाडेंचे विश्वासू होते. यातून साधारण १७०४ मध्ये अभोण्याच्या देवराव ठोकेंची मुलगी उमाबाई छत्रपती शाहूंचे सरसेनापती खंडेराव दाभाडेंच्या घरात सून म्हणून गेली. उमाबाईंच्या माहेरीही सरदारकीचे वातावरण असल्याने लढवय्या बाणा त्यांच्यात होताच. शस्त्र चालविण्यात आणि घोडस्वारीत त्या अव्वल होत्या. खंडेरावांच्या निधनानंतर उमाबाईंचा मुलगा त्रिंबकरावांकडे सरसेनापतिपद शाहूंनी सोपविले. मात्र गुजरातच्या सुभ्यावरून त्रिंबकराव व बाजीराव पेशवे यांच्यात संघर्ष निर्माण झाला. यावर मात करण्यासाठी बाजीराव पेशव्यांनी उमाबाईंच्या माहेरकडचे दलपतराव ठोके, भावसिंगराव ठोके, बजाजी आटोळे, कवडे व सिन्नरचे देशमुख, कुंवर बहादुर यांच्यासह ठोकेंच्या सर्व जवळच्या मंडळींना फोडून आपल्या पक्षात सामील केले. २५ नोव्हेंबर १७३० रोजी भावसिंग ठोके याला बाजीरावांनी सरंजाम व कुंवर बहादुर याला वस्त्रेही दिली. निझामाची चाकरी सोडून बाजीरावांच्या पदरी आलेल्या भावसिंग ठोकेने बागलाण परिसरात धुमाकूळ घालायला सुरूवात केली होती.वैतागलेल्या निझामाने पेशव्यांना पत्र लिहीत भावसिंग ठोके यांना मराठ्यांच्या चाकरीत ठेवू नये, अशी विनंती केली. त्यावर निझामाची मर्जी राखावी म्हणून शाहूंनी पेशव्यांना भावसिंग ठोके यास चाकरीत ठेवू नये, अशी आज्ञा केली होती. मात्र तसे घडले नाही. डभईच्या युद्धात १ एप्रिल १७३१ मध्ये पेशव्यांच्या पदरी गेलेल्या भावसिंगराव ठोकेने सेनापती त्रिंबकरावांवर बारगिरास सांगून गोळी झाडली. यामुळे त्रिंबकरावांचा मृत्यू झाला, असे संदर्भ सेनापती दाभाडे दफ्तर, डॉ. एस. ए. बाहेकर व पुष्पा दाभाडे यांच्या उमाबाईंवरील पुस्तकात मिळतात. त्रिंबकरांवांच्या मृत्यूमुळे उमाबाई दुखावल्या गेल्या. या प्रकरणात बाजीराव पेशव्यांना माफी द्यावी म्हणून शाहू स्वत: त्यांना घेऊन तळेगावास गेले. छत्रपती स्वत: आल्याने उमाबाईंना पेशव्यांना माफ करावे लागले. त्यानंतर शाहूंनी त्रिंबकरावांचा लहान भाऊ यशवंतरावांना सरसेनापतिपद तर धाकटा बाबुरावाकडे सेनाखासखेल ही पदे दिली. मात्र ते अल्पवयीन असल्याने सरसेनापती व सेनाखासखेल या दोन्ही पदांचा कारभार उमाबाईंच्या हाती आला. पती आणि मुलाच्या मृत्यूचे दु:ख उमाबाईंनी काळजात एकवटले आणि रणभूमीवर उतरल्या.

गुजरातचा बहुतेक भाग जरी मराठ्यांच्या ताब्यात असला तरी दिल्लीच्या बादशहाने आपली दहशत कायम ठेवली होती. दाभाडेंची पकड गुजरातवरून कमी झाल्याचे पाहून मारवाडचे राजा अभयसिंग याने दिल्ली बादशहाच्या मदतीने आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला. त्याने बडोदा हस्तगत करून डभईला वेढा घातला. पिलाजी गायकवाड उमाबाईंचा उजवा हात होता. हे ओळखून अभयसिंगने पिलाजींचा खून घडविला. उमाबाईंचा बाणेदारपणा त्यांच्या लष्करी नेतृत्वात होता. हेच दाखवित पिलाजींच्या हत्येनंतर उमाबाईंनी अभयसिंगवर स्वारी केली. उमाबाईंच्या भीतीने हार पत्करून अभयसिंग गुजरातमधून पळाला. मात्र अहमदाबादमधील मोगलाचे ठाणे अजूनही कायम होते. १७३२ मध्ये उमाबाईंनी गुजरातवर दुसरी स्वारी केली. यावेळी मोगलांचा जोरावरखान बाबी नावाच्या सरदाराने ‘एक विधवा माझ्याशी काय लढणार, तुझा निभाव लागणार नाही,’ अशा आशयाचे पत्र उमाबाईंना पाठवले. याचे उत्तर रणांगणात हत्तीवर बसलेल्या पांढऱ्याशुभ्र वेशातील सरसेनापती उमाबाईंनी युद्धांत अलौकिक शौर्य गाजवून दिले. उमाबाईंचे रौद्ररूप पाहून जोरावरखान अहमदाबादच्या तटात लपला. मराठा सैन्यांनी मुगल पठाणांचे मृतदेह एकावर एक खच करून तटावर जाण्याचा मार्ग तयार केला, अशी इतिहासात नोंद मिळते. एका महिला सरसेनापतीने केलेल्या या कामगिरीवर छत्रपती शाहू खूश झाले होते. त्यांनी उमाबाईंना साताऱ्यात बोलावून दरबारात त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पायात सोन्याचे तोडे घातले. सोन्याचे तोडे मिळविण्याचा मान उमाबाईनंतर त्यांचा मुलगा यशवंतरावांनी सुरतेच्या लढाईत मिळविला. पेशव्यांवरील उमाबाईंची नाराजी पुढेही नानासाहेब पेशव्यांमुळे कायम राहिली. शाहू महाराजांच्या निधनानंतर दाभाड्यांचा मुख्य आधार कोसळला. उमाबाई ताराबाईंबरोबर गेल्या. जात उमाबाई, ताराबाई, आणि दमाजी गायकवाड यांनी पेशव्यांच्या विरूद्ध उठाव केला. तेव्हा १६ मे १७५१ रोजी पेशव्यांनी दाभाड्यांची सर्व मंडळी पुण्यात होळकरांच्या वाड्यात नजरकैदैत ठेवली; परंतु उमाबाईंनी पेशव्यांशी समझोता घडवून आणला व ते प्रकरण संपले. मात्र दरम्यान, उमाबाईंनी पेशव्यांविरूद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसते. पेशवाईतील राजकारणाच्या रंगात उमाबाईंची पकडही यादरम्यान पहायला मिळते. उमाबाईंची तब्येत नंतरच्या काळात खालावली. २८ नोव्हेंबर १७५३ रोजी त्यांचे पुण्यात निधन झाले. ‘या ऐतिहासिक घटनांमध्ये सरसेनापती हा बहुमान मिळालेल्या उमाबाई खंडेराव दाभाडेंचे कार्य मोठे आहे.’ असे दाभाडे घराण्याचे वंशज सरदार सत्यशील दाभाडे सांगतात.

अभोण्याच्या ठोके घराण्यातील ३ मुली सरदार दाभाडे घराण्यात दिल्या होत्या. यात सेनापती दाभाडेंचा तीन नंबरचा मुलगा सेनाखासखेल सवाई बाबुराव दाभाडे यांची एक पत्नी ही हरिसिंग ठोके यांची बहीण अभोणकर ठोके घराण्यातील होती. तर सेनापती यशवंतराव (दुसरा दत्तक) याची पत्नी लक्ष्मीबाई ही हरिसिंग ठोकेंची मुलगी होती. हा इतिहास अभोण्याच्या गढीवरून अनुभवताना अन् बालपणी उमाबाई या गढीत तलवारीशी खेळतायेत असा प्रसंग डोळ्यासमोरून तरळताना अंग शहारून जातं. ठोके यांचे वंशज गावातील पेठ गल्लीत राहतात. त्यांच्याकडील सोन्याची मूठ असलेली तलवार हातात घेतल्यावर उमाबाईंनीही ही तलवार हातात घेऊन शौर्य घडविले असेल, असे वाटायला लागतं. ठोकेंच्या घरातील देव्हारा आणि देव्हाऱ्यातील व्यालावर बसलेली महिषासूरमर्दिनीची सप्तशृंगीची मूर्ती आवर्जून पाहण्यासारखी आहे. उमाबाईंची सप्तश्रृंगीवरील श्रद्धा त्यांच्या दानातून दिसते. त्यांनी सप्तश्रृंगी मंदिराच्या पायऱ्या बांधल्याची नोंद मिळते. ठोकेंचे ऐश्वर्य आता इतिहासापुरते शिल्लक राहिलेले दिसते. मात्र ठोके घराण्यातील व्यक्त‌िंच्या डोळ्यातील चमक अन् त्यांना मिळाला मान अजूनही कायम आहे. गावात होळीचा कार्यक्रम प्रथम वाड्यातून होलीका पूजनानंतरच सुरू होतो, अशी परंपरा आहे. ठोकेंच्या घरातील देवीच्या मूर्तीची दसऱ्याला दरवर्षी मिरवणूक निघते. हा सोहळा पाहण्यासारखा असतो, असे सरदार ठोके घराण्याचे वंशज जलालसिंग ठोके सांगतात.

अभोणा पाहताना जुन्या बांधणीची घरे जशी भुरळ घालतात तसेच गावातील मंदिरेही आपले वेगळेपण दाखविताना दिसतात. आनंदी देवी मंदिर, खंडेरायाची ठेकडी, मारूतीची दोन मंदिरे, महादेव मंदिर, शनीमंदिर, राममंदिर, गणपती या मंदिरांबरोबरच गोपालकृष्ण मंदिर गावाची शोभा वाढविताना दिसतो. याचबरोबर गढी जवळील समाध्याही पाहण्यासारख्या आहेत. गढीच्या मागील बाजूला नदी काठावरील महादेव मंदिर निसर्गसौंदर्याने सजलेलं आहे. हे मंदिर प्राचीन असल्याचे पुजारी गोविंद चवरे सांगतात. तेथून थोडं पुढं गेलं की, गढीलगत गोपालकृष्ण मंदिरही सुंदर आहे. येथील काष्टशिल्प नजरेत भरत तर मंदिरातील शांती तेथून पाय काढू देत नाही. मंदिरात गेल्यावर कृष्णांची काळापाषाणातील सुंदर मूर्ती पाहताना मोहाडीच्या श्रीकृष्णाची आठवण होते. या दोन्ही मूर्ती एकाच कलाकाराने साकारल्याचे प्रकाश देशमुख सांगतात. देव्हाऱ्यातील शिवाचा अर्धनारीनटेश्वराचा तांब्याचा मुखवटा नजरेत भरतो. गावात खंडेरायाची यात्रा भरते. तसेच श्रावणात गोपाळकृष्णाचा सात दिवस सप्ताह भरतो. पूर्वी यात्रेत बोहाडे सादर व्हायचे; मात्र आता ही परंपरा पंधरा वर्षांपासून बंद आहे. सरदार पेठ गल्लीतील जहागिरदार देशमुख मूळचे वायकुळे. ते काशी, राजस्थान, गुजरात करीत हतगडच्या लढाई दरम्यान कनाशीत व तेथून अभोण्यात स्थायिक झाले. त्यांना १८ गावांची वतनदारी मिळाली होती, असे प्रकाश देशमुख व प्रणव देशमुख सांगतात. गावात आदिवासी समाजही मोठ्या प्रमाणात आहे. तसेच पेठ गल्लीत जैनांचे सुंदर मंदिर आहे. या मंदिराला अनेकांनी सहकार्य केल्याचे कन्हूभाई पुजारी सांगतात. गावात दोन बारवाही आहेत. मात्र त्यांची अवस्था वाईट आहे. त्यांचा गावाला पाण्यासाठी वापर होऊ शकतो.

सोन्याची मूठ असलेली तलवार, सप्तश्रृंगीची अनोखी मूर्ती, ठोके, देशमुख घराण्याचा इतिहास अन् उमाबाईंनी दाभाडे घराण्यात उज्ज्वल केलेले अभोण्याचे नाव हा खरा अभोण्याचा वारसा आहे. गढीने देह ठेवला असला तरी इतिहास पुन्हा शौर्य गाजवायला सज्ज असल्याचं अभोणा भटकताना वाटतं. त्यामुळेच अभोण्याची सफर एकदा करायलाच हवी.

Thanks : https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/ravivar-mata/story-about-abhona-village/articleshow/61899423.cms

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*