टेक्स्ट मेसेजची पंचविशी साजरी

जगातल्या पहिल्या टेक्स्ट मेसेजला रविवारी २५ वर्षे पूर्ण झाली. सॉफ्टवेअर डेव्हलपर नील पॅपवर्थ यांनी ३ डिसेंबर १९९२ रोजी त्यांचा सहकारी रिचर्ड जर्विस याला ‘मेरी ख्रिसमस’ हा पहिला टेक्स्ट मेसेज संगणकाद्वारे पाठवला होता. आता २५ वर्षांनंतर पॅपवर्थ यांनी इमोजीसचा वापर करून हाच मेसेज नव्या स्वरूपात तयार करून या ऐतिहासिक घटनेला उजाळा दिला.

२२ वर्षीय पॅपवर्थ त्यावेळी व्होडाफोनसाठी शॉर्ट मेसेज सर्व्हिस (एसएमएस) निर्मितीवर काम करत होते. या कामाला मूर्तरूप दिल्यानंतर त्यांनी आपला सहकारी रिचर्डला ख्रिसमसच्या शुभेच्छा देणारा पहिला मेसेज पाठवून संदेशवहन क्षेत्रातील मैलाचा पहिला दगड रोवला. त्यानंतर एका वर्षाने म्हणजेच १९९३मध्ये नोकियाने विशिष्ट ‘बीप’सह ‘एसएमएस’ फिचर कार्यन्वित केले.

सुरुवातीला टेक्स्ट मेसेजला १६० अक्षरांची मर्यादा होती. त्यानंतर ‘एलओएल’सारखे (लाफिंग आऊट लाऊड) अध्याक्षरांवरून संदेशाचे लघुरूप करून संभाषणाची पद्धत रूढ झाली व कीबोर्डवरील अक्षरांचा वापर करून :), किंवा ヽ(•‿•)ノअशाप्रकारे भावना व्यक्त केल्या जाऊ लागल्या. यातूनच प्रेरित होऊन पुढे इमोजिसची निर्मिती झाली.

पॅपवर्थ यांनी पहिला मेसेज पाठवल्याच्या सात वर्षांनंतर म्हणजे १९९९मध्ये विविध नेटवर्क्सवर मेसेज पाठवले जाऊ लागले व टेक्स्ट मेसेजला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. रविवारी टेक्स्ट मेसेजची पंचविशी साजरी करण्यासाठी जगभरातून टेक्स्ट, व्हिडीओ आणि इमोजीसचा वापर करून ‘मेरी ख्रिसमस’ संदेशाचे आदनप्रदान करण्यात आले.

टेक्स्ट मेसेज इतका लोकप्रिय होईल वा इमोजी किंवा मेसेजिंग अॅपचा वापर करून कोट्यवधी नागरिक त्याचा वापर करतील, याची पुसटशीही कल्पनाही १९९२मध्ये नव्हती. टेक्स्ट मेसेजच्या या प्रवासाकडे पाहिल्यानंतर मी पाठवलेला ख्रिसमस मेसेज मोबाइलच्या इतिसातील अत्यंत महत्त्वाचा क्षण होता, हे स्पष्ट होते.

– नील पॅपवर्थ, टेक्स्ट मेसेजचे निर्माते

>> टेक्स्ट मेसेजचा प्रवास
– ३ डिसेंबर १९९२ रोजी सॉफ्टवेअर डेव्हलपर नील पॅपवर्थ यांनी व्होडाफोन नेटवर्कवर मेरी ख्रिसमस हा पहिला टेक्स्ट मेसेज आपल्या सहकाऱ्याला पाठवला.

– सुरुवातीला टेक्स्ट मेसेजला १६० अक्षरांची मर्यादा होती.

– हळूहळू ‘एलओएल’सारखे (लाफिंग आऊट लाऊड) अध्याक्षरांवरून संदेशाचे लघुरूप वापरले जाऊ लागले.

– किबोर्डवरी अक्षरांचा वापर करून :), किंवा ヽ(•‿•)ノअसे इमोश्कॉन्स वापरले जाऊ लागले व त्यानंतर १९९९मध्ये जपानने सर्वप्रथम इमोजीसची निर्मिती केली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*