सायकल शेअरिंगला पाच डिसेंबरचा मुहूर्त

सायकलींचे शहर अशी पुण्याची ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी’च्या वतीने औंध आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रायोगिक तत्त्वावर ३०० सायकल शेअरिंगची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. पाच डिसेंबरला या सेवेचे उद्घाटन होणार आहे. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पहिल्या अर्ध्या तासाला एक रुपया भाडे आकारून ही सुविधा दिली जाणार आहे.
पुणे महापालिकेच्या सायकल योजनेच्या मान्यतेवरून भाजप पदाधिकारी आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यात शह-काटशहाचे राजकारण रंगले असतानाच; स्मार्ट सिटी योजनेंतर्गत क्षेत्र विकासासाठी निवडण्यात आलेल्या बाणेर-बालेवाडीमध्ये सायकल धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाच डिसेंबरला महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. स्मार्ट सिटी योजनेसाठी महापालिकेने बाणेर-बालेवाडीची निवड केली आहे. पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने या भागासाठी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’चा प्रकल्प प्रस्तावित केला होता. त्यासाठी दहा कोटी रूपयांची तरतुदही केली होती. या प्रकल्पासाठी कंपनीकडून ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ मागविण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देऊन काही कंपन्यांनी तयारी दर्शविली असून प्रायोगिक प्रकल्पांसाठी सुमारे तीनशे सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत.
औंध-बाणेर-बालेवाडी भागात रस्त्यांचा पुनर्विकास तसेच प्लेसमेकिंग प्रकल्प राबविण्यात आले असून, त्या ठिकाणीही लवकरच हा उपक्रम सुरू केला जाणार आहे. या योजनेंर्ग‍त प्रत्येक सायकलला बारकोड लावण्यात आले आहेत. हे कोड मोबाइलद्वारा स्कॅन केल्यानंतर सायकल अनलॉक होईल. पेटीएमच्या माध्यमातून पैसे भरता येणार आहेत. पुढील काही दिवसात अजून एक कंपनी सहभागी होणार आहे. सध्या औंधमध्ये १० ठिकाणी व विद्यापीठात ९ ठिकाणी सायकल स्टँड उभारण्यात आले आहे. विद्यापीठात १०० तर, औंधमध्ये २०० सायकली ठेवण्यात येणार आहेत. सर्व सायकलमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे सायकलचे ठिकाण कळण्यास मदत होणार आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*