‘सधन व्यक्तीने आरक्षणाचा आर्थिक लाभ घेणे ही लाचारी’

सुशीलकुमार शिंदे यांचे मत

दलित व मागासवर्गीय समाजातील सधन व्यक्तींनी आरक्षणाचा आर्थिक लाभ घेणे ही लाचारी आहे, असे परखड मत देशाचे माजी गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. रविवारी मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक प्रा. दत्ता भगत यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

समारंभाला प्रामुख्याने ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, माजी न्या. विकास सिरपूरकर, प्रा. दत्ता भगत, डॉ. गिरीश गांधी, डॉ. सतीश चतुर्वेदी, सत्यनारायण नुवाल, सुधीर बाहेती उपस्थित होते.

देशातील सर्व महापुरुषांनी त्यांच्या काळात बहुमूल्य समाजोपयोगी विचार मांडले असून ते सर्वाना प्रेरणादायी आहेत. हल्लीच्या वास्तविक स्थितीनुसार त्यात किंचित बदल गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेल्या आरक्षणामुळे देशात गेल्या ३० ते ४० वर्षांपासून दलित व मागासवर्गीयांमध्ये चांगली सामाजिक व आर्थिक प्रगती झाली आहे, परंतु आजही काही घटक माघारलेलाच आहे. त्यामुळे आणखी काही काळ या घटकाला आरक्षणाची गरज आहे, परंतु सामाजिक आणि आर्थिकरित्या सधन झालेल्या व्यक्तीने स्वत:हून आरक्षणातील आर्थिक लाभ टाळायला हवे. वारंवार आरक्षणाकरिता सगळेच समाज मोठय़ा प्रमाणावर पुढे येत असल्याने दलित समाज उच्चवर्णीय झाला काय? अशी शंका येत आहे प्रा. दत्ता भगत हे विचारांचे नाव असून ते व्यक्तीचे नाव नाही. त्यांनी आयुष्यभर साहित्य क्षेत्रासाठी केलेल्या कामामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान करणे हा समाजाचा गौरव आहे, असे शिंदे म्हणाले.

विकास सिरपूरकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे देशातील सर्व धर्म, जातींना जोडणारे आहे. संविधानात डॉ. आंबेडकरांनी केवळ एका समाजाचा विचार केला नसून सर्व जाती-धर्माचा विचार केला आहे. मारवाडी समाजानेही देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन तेथील नागरिक आणि गाव-शहराला आपलेसे केले आहे. येथे मेहनतीच्या जोरावर त्यांनी गाव व शहराच्या विकासातही योगदान दिले आहे. डॉ. यशवंत मनोहर म्हणाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्व जात, धर्म, नागरिकांना २६ नोव्हेंबरला संविधानाची निर्मिती करून भारतीय नागरिक ही ओळख मिळवून दिली. या दिवशी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रा. दत्ता भगत यांना पुरस्कार मिळणे ही समाजाकरिता अभिमानाची बाब आहे. समारंभाची प्रस्तावना डॉ. गिरीश गांधी यांनी, तर आभार महेश पुरोहित यांनी मानले.

देशात सांस्कृतिक दहशतवाद

कोणताही धर्म, कला, संस्कृती ही शोषणासाठी नसून प्रत्येकाला कायद्याने काम करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु हल्ली काही राजकीय पक्ष व संघटना या राज्यात अमूक चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देणार नाही, कलावंताने या चित्रपटात काम केल्यास त्यांचे कान-नाक कापू यासह विविध पद्धतीने दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात. पद्मावती चित्रपटासह इतरही काही चित्रपटांच्या बाबतीत तसे होत आहे. कोणत्या चित्रपटात काही आपत्तीजनक असल्यास त्यावर कायद्यान्वये विविध यंत्रणांकडे दाद मागण्याची गरज आहे, परंतु काही प्रवृत्ती स्वयंभू निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हा देशात सांस्कृतिक दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न आहे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोघेही समाजाकरिता भूषण आहेत. दोघांची काम करण्याची शैली वेगळी असून देशाचा विकास हे त्यांचे ध्येय होते. डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा सत्कार म्हणून हा पुरस्कार स्वीकारत आहे.   – प्रा. दत्ता भगत

News : https://www.loksatta.com/nagpur-news/sushilkumar-shinde-comment-on-reservations-issues-1591491/

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*