खुशखबर! आता गाडी टो करण्यापूर्वी ध्वनीक्षेपक वाजवले जाणार

एखादे वाहन उचलत असताना त्या वाहनाचा मालक तेथे आल्यास टोईंग शुल्क आणि दंडाची रक्कम आकारुन ते वाहन सोडण्यात येणार आहे. याशिवाय गाडी टो करण्यापूर्वी ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून गाडी काढण्यासाठी एकदा सूचनाही देण्यात येणार आहे, याबाबतची नवी नियमावली वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आली आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी महिला आणि तिचा लहान मुलगा कारमध्येच बसले असताना वाहतूक पोलिसांनी त्यांचे चारचाकी वाहन उचलून नेल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर पोलिस आणि त्या महिलेकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात होते. तसेच वाहतूक पोलिसांवरही सर्वच स्तरातून टीका केली जात होती. याप्रकरणाची गंभीर दखल घेत वाहतूक विभागाकडून टोईंगबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.

या नव्या नियमावलीअंतर्गत वाहन उचलताना वाहनाचा मालक आल्यास त्याला दंडाची रक्कम आणि टोईंग शुल्क आकारुन वाहन सोडण्यात येणार आहे. तसेच गाडी टो करण्यापूर्वी ध्वनीक्षेपकावरून गाडी काढण्यासाठी एकदा सूचनाही देण्यात येईल. याशिवाय एखादी गाडी नो पार्किंगला उभी असेल आणि त्या वाहनाचा चालक गाडीमध्ये असल्यास ती गाडी उचलू नये, असेही या परिपत्रकात म्हटले आहे.

वाहन उचलताना वाहतूक पोलिसांच्या मदतीला असलेल्या कर्मचाऱ्यांकडून अनेकदा उद्धट भाषेत बोलणे, गैरवर्तन करणे, असे प्रकार सर्रासपणे पाहिला मिळत होते. त्याची दखलही वाहतूक विभागाने घेतली असून, वाहनचालकाशी गैरवर्तन करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांना गैरवर्तन करु नये, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, वाहतूक विभागाच्या या नव्या नियमावलीने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे.

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*