आजीबाईंची शाळा आता कॅनडात

वयोवृद्ध महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुरबाडच्या फांगणे गावात सुरू झालेल्या आजीबाईच्या शाळा आता थेट कॅनडा येथे भरणार आहे. ही संकल्पना राबवणारे शिक्षक योगेंद्र बांगर यांना थेट कॅनडामध्ये येण्याचे निमंत्रणही तेथील लूसिन्ट क्याय कन्सल्टिंग या संस्थेचे जान पेझार्रो यांनी धाडले आहे.

गेल्यावर्षी महिला दिनाचे औचित्य साधत मुरबाड तालुक्यात आजीबाईंच्या शाळेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. चूल आणि मूल या रहाटगाड्यात अडकलेल्या आणि आयुष्य अशिक्षितपणात घालवणाऱ्या महिलांना किमान अक्षरओळख व्हावी, यासाठी मोतीराम गणपतदादा चॅरिटेबल ट्रस्ट आणि जिल्हा परिषदेच्या सहकार्याने ही शाळा सुरू झाली होती. शाळेत ६० ते ९० वर्षे वयोगटातील २८ आजी शिक्षणासाठी येतात. दररोज दुपारी २ ते ४ या वेळेत ही शाळा भरते. अल्पावधीतच हा उपक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी गावात दाखल होत आजीबाईंची शाळा घराघरांत पोहोचवली. योगेंद्र बांगर यांच्या प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या या उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आणि मदतीचा हातही पुढे केला होता. अनेक परदेशी पाहुणे या शाळेत येत असतात. कॅनडा येथील लूसिन्ट क्याय कन्सल्टिंग या सामाजिक संस्थेला त्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे प्रतिनिधी इथे दाखल झाले होते.

शाळेची वेळ, अभ्यासक्रमाची रचना, शाळेचे गावापासूनचे अंतर, शाळेत आजीबाईंना सामावून घेण्याची प्रक्रिया, शिक्षण साहित्य याविषयीची माहिती संस्थेने सुरुवातीला संकलित केली होती. त्यानंतर शाळेच्या या अभिनव उपक्रमाला कॅनडामध्ये विशेष पसंती मिळत असून तिथल्या ग्रामीण भागामधील रहिवाशांसाठी विशेषतः ज्येष्ठांसाठी हा उपक्रम राबवण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे. या उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक होत असल्याने योगेंद्र बांगर यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

News: https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/ganny-school-will-be-opened-in-canada/articleshow/61811401.cms

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*