जाणून घ्या अमेरिकेतल्या सर्वात आवडत्या ‘थँक्सगिव्हिंग’ सणाबदद्ल

निसर्गाबद्दलचा, निर्मात्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस

अडीअडचणीच्या काळात आपल्या मदतीसाठी कोणीना कोणी धावून येतोच. संकटकाळी त्या व्यक्तीनं आपल्याला मदत केली म्हणून आपण त्याचे आपल्यापरीनं आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. पण अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशात आभारप्रदर्शनाचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा वेगळा सणच असतो. ‘थँक्सगिव्हिंग’ Thanksgiving म्हणून तो ओळखला जातो. नोव्हेंबर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी अमेरिकेत तसेच अनेक देशात हा सण साजरा केला जातो. निसर्गाबद्दलचा, निर्मात्याबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ‘थँक्सगिव्हिंग’ सण ओळखला जातो. खरंतर चारशे वर्षांपूर्वी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुरू झालेल्या या परंपरेनं १९ व्या शतकात जास्तीत जास्त लोकांना जवळ आणलं आणि या दिवसाचं पूर्ण रुपडंच पालटवलं.

या दिवशी सगळ्या शाळांमध्ये, ऑफिसेसमध्ये, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये खाण्याचे डबाबंद पदार्थ, ब्लँकेट्स, औषधे अशा किती तरी वस्तू घरून आणून एकत्र साठवून गरजू लोकांना किंवा शेजारच्या संकटग्रस्त देशांना वाटल्या जातात. निसर्ग, आपल्या आयुष्यातल्या आजूबाजूच्या व्यक्तीचे आभार मानायचे त्यासाठी मेजवानी द्यायची किंवा उपयोगी वस्तू द्यायच्या अशी प्रथा इथे आहे.

‘थँक्सगिव्हिंग’चा इतिहास
अमेरिकेत पहिला थँक्सगिव्हिंग १६२१ च्या नोव्हेंबर महिन्यात साजरा केला गेल्याचं उल्लेख आढळतो. १६२० साली इंग्लडमधले १०२ प्रवासी नवीन भूखंडाच्या शोधात बोटीनं निघाले होते. पण वारा, अपुरा अन्नाचा साठा, आजारपण यामुळे अर्ध्याधिक लोक मृत्युमुखी पडले. ही बोट शेवटी प्लिमथमध्ये आली. प्रवासात जे लोक वाचले त्यांना ‘नेटिव्ह अमेरिकन्स’ लोकांनी खूप मदत केली. त्यांना तिथेच स्थायिक होण्यासाठी, घरं बांधून देणं, शेतीची कामं शिकवणं अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी स्थानिकांनी मदत केली. त्यांचे आभार मानण्यासाठी या नवीन लोकांनी त्यांना जंगी मेजवानी दिली. तो दिवस होता १६२१ च्या नोव्हेंबर महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि तेव्हापासून ‘थँक्सगिव्हिंग’च्या प्रथेला सुरूवात झाली.

थँक्सगिव्हिंगची मेजवानी

थँक्सगिव्हिंगची मेजवानी टर्कीच्या मांसाशिवाय पूर्णच होत नाही. टर्की खाण्याची प्रथा नेमकी कधी सुरू झाली ते माहिती नाही. पण या मेजवानीत स्टफ केलेली टर्की असेतच असते. शिवाय पंपकिन पाय, अंडी, इतर मांसाहारी पदार्थ, उकडलेली कणसे, रताळं, बटाटय़ाचे भरीत, वेगवेगळी सॅलड्स, शेंगा, क्रॅनबेरी सॉस, फळांचे रस असा फक्कड बेत असतो. गंमत म्हणजे थँक्सगिव्हिंगला दरवर्षी व्हाइट हाऊसमधून राष्ट्राध्यक्ष काही टर्कींना अभय देऊन परत त्यांच्या फार्मवर पाठवतात.
मेसी परेड
थँक्सगिव्हिंगला अमेरिकन्स बरोबर सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो तो ‘मेसी’ या प्रसिद्ध साखळी दुकानाची परेड. मेसीच्या परेडची सुरुवात १९२४ साली झाली. हवेत तरंगणारे मोठे, मोठे फुगे, सजवलेले रथ, रथांमध्ये सर्वाच्या परिचयाची कार्टून कॅरेक्टर, नावाजलेले अभिनेते अशी खूप मोठी मिरवणूक ठराविक वेळेला सुरू होऊन तीन तास चालते.
ब्लॅक फ्रायडे
थँक्सगिव्हिंगच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या शुक्रवारला ब्लॅक फ्रायडे म्हणतात. या दिवशी नाताळच्या आणि नवीन वर्षांच्या खरेदीची सुरुवात करण्याची प्रथा आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*