झाले बहु, होतील बहु परंतु या सम हा!

– चिंतामणी सहस्रबुद्धे

वसंतरावदादा कुशल संघटक होते. उत्कृष्ट संयोजक होते, त्याचे प्रत्यंतर स्वातंत्र्य लढ्याच्या वेळीच आले होते. खेडोपाडीच्या शेतकरी, शेतमजूर बांधवांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्धचा लढा दादांनी तीव्र केला होता. अगदी सर्वसामान्य लोक या लढ्यात दादांसारख्या नेत्यांच्या पुढाकारामुळे सहभागी झाले होते. स्वातंत्र्योत्तर काळातही दादांच्या या अलौकिक संघटन शक्तीचा, लोकसंग्राहक कौशल्याचा प्रत्यय आला. स्वामी रामानंद भारती, ज्येष्ठ विचारवंत वि. स. पागे, ज्येष्ठ नेते धुळाप्पाण्णा नवले, संपतरावनाना माने, धोंडीरामबापू माळी, धोंडीरामबापू पाटील, विठ्ठलदाजी पाटील, चारुभाई शहा यांच्या सहकार्याने दादांनी स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर विकासकार्यातही स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवला.

काँग्रेसचे महान नेते

ऐन तारुण्यात वसंतदादा स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले. अगदी सुरुवातीपासून ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यांच्यातील संघटन कौशल्य हेरून त्यांच्यावर तत्कालीन तासगाव तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. तासगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून दादांनी काँग्रेस  संघटनेला बळकटी दिली. अनेक नवे कार्यकर्ते संघटनेशी जोडले. शेती, शेतकरी यांचे प्रश्‍न काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावरून मांडायला सुरुवात केली. कालांतराने त्यांच्यावर पक्षाने अधिकाधिक व्यापक जबाबदारी सोपवण्यास प्रारंभ केला. त्यामुळे  काँग्रेसचे काम आणि प्रभाव तालुका पातळीपासून जिल्हा, राज्य आणि देश पातळीपर्यंत जाऊन पोहोचला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी देदीप्यमान कामगिरी केली. गावपातळीपासून ते अगदी विधानसभा,लोकसभेपर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा दबदबा निर्माण झाला. ग्रामपंचायतीपासून ते मुंबईपर्यंतच्या प्रत्येक सत्ता स्थानावर काँग्रेस पक्षाची मजबूत पकड तयार झाली. दादांनी केवळ निवडणूक लढवणारी आणि त्या जिंकणारी एक यंत्रणा एवढेच काँग्रेस पक्षाचे स्वरुप मर्यादित ठेवले नाही, तर तिला व्यापक जनाधार मिळवून दिला. सर्व स्तरातील सर्व  समाजांचे प्रश्‍न समजावून घेणारी, ते शासन पातळीवर मांडणारी, प्रसंगी जनहितासाठी सरकारविरुद्ध दोन हात करण्यास सिद्ध असलेली अशी  लोककल्याणकारी संघटना त्यांनी काँग्रेसच्या माध्यमातून उभी केली. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतील नवा महाराष्ट्र क्रमाक्रमाने विकसित झाला. देशातही अग्रेसर बनला. त्याचे श्रेय दादांनी उभ्या केलेल्या मजबूत आणि लोकांच्या सुखदुःखाशी जोडल्या गेलेल्या काँग्रेस संघटनेला द्यावे लागेल.

दादांना संघटनात्मक कामात खूप रस होता. त्यामुळे पक्षाचे सर्व कार्यक्रम हिरीरीने राबवण्यासाठी त्यांचा पुढाकार असे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर वरिष्ठ नेत्यांनी जबाबदारी सोपवली. त्यावेळी त्यांनी दिल्लीतही स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. देशभरातील काँग्रेस संघटनेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत राष्ट्रीय सरचिटणीस हे पद एवढे प्रभावी असते याची कल्पना कुणालाही नव्हती. मात्र दादांनी त्या पदाची ताकद आणि उंची वाढवली. अखेरचा श्‍वास घेईपर्यंत त्यांना काँग्रेस पक्षाची काळजी वाटत होती. तो पक्ष अधिकाधिक लोकाभिमुख कसा होईल असा त्यांचा प्रयत्न सुरू होता.

कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया घातला

स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईतील काही कारखाने आणि सूतगिरण्या यांचा अपवाद वगळता महाराष्ट्र हे काही औद्योगिक राज्य म्हणून ओळखले जात नव्हते. मुंबई वगळता अन्य लहान-मोठी शहरे औद्योगिक क्रांतीची वाट पाहत होती.  ग्रामीण भागात तर परंपरागत कुटिरोद्योग आणि ग्रामोद्योगांचा अपवाद वगळता रोजगार निर्मितीची अन्य साधने नव्हती. त्यामुळे मुंबईकडे सगळ्यांचा ओढा होता. ग्रामीण भागात शेतीमाल भरपूर पिकत होता, मात्र त्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी नव्हती. कोणतेही  प्रस्थापित भांडवलदार किंवा कारखानदार ग्रामीण किंवा निमशहरी भागात कारखानदारी काढण्यास फारसे उत्सुक नव्हते.  त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीमालावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी करणे एवढाच उपाय होता. ते सूत्र दादांसारख्या द्रष्ट्या नेत्यांनी लक्षात घेतले आणि  या राज्यातील कृषी औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.

दादांच्या प्रेरणेने, पुढाकाराने आणि प्रत्यक्ष सहभागाने सुरू झालेली सहकारी चळवळ  नंतर केवळ साखर कारखान्यांपुरतीच मर्यादित राहिली नाही. त्या काळात सांगली जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात भुईमुगाचे चांगले उत्पादन होते. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात कापसाचे उत्पादन भरपूर होत असे. सहकारी तत्त्वावर तेलगिरण्या सुरू झाल्या. उत्तम दर्जाचे खाद्यतेल, सकस पशुखाद्य तयार होऊ लागले. जागोजागी सूतगिरण्या उभ्या राहिल्या. त्या पाठोपाठ सहकारी तत्त्वावर खरेदी-विक्री संघ आणि  कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन झाल्या. गावोगावच्या जुन्या विकास सोसायट्या बळकट झाल्या. अनेक नव्या सोसायट्या स्थापन झाल्या. तालुका पातळीवर बँका स्थापन झाल्या. त्यानंतर दूध उत्पादनाला महत्त्व आले. शहरी भागातून दुधाची गरज आणि मागणी वाढत होती. परिणामी, दूध संस्था, दूध संघ स्थापन झाले. दुधापासून उपपदार्थांची निर्मिती सुरू झाली.  या सगळ्या स्तरावरील संस्थांमुळे ग्रामीण भागाचे चित्र बदलू लागले. केवळ पारंपरिक शेतीत गुंतलेला शेतकरी शेतीचे नवे प्रयोग करू लागला.  त्यातूनच फळशेतीची कल्पना पुढे आली. द्राक्षे, डाळिंबे, चिकू, मोसंबी, संत्री, अंजिर अशा फळांच्या बागा राज्यात ठिकठिकाणी बहरल्या.

कृषी औद्योगिक क्रांतीतूनच जलक्रांती

कृषी औद्योगिक क्रांती होत असतानाच महाराष्ट्रातील शेतीचे स्वरुपही बदलू लागले होते. जिराईती शेती बाजूला पडून बागायती शेती सुरू झाली होती. पैशांची पिके (कॅश क्रॉप) घेण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढत होता. परिणामी, शेतीला हुकमी आणि बारमाही पाण्याची गरज होती. वसंतदादांनी त्यातूनच बारमाही पाणीपुरवठ्याचा सिद्धांत मांडला. पावसाचे जमिनीवर पडणारे पाणी अडवून ते शेतीसाठी वळवण्याची कल्पना त्यांनी मांडली. आज ‘जलयुक्त शिवार योजने’चा बोलबाला सुरू आहे, मात्र  ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मंत्र वसंतरावदादांनी  महाराष्ट्राला दिला ते विसरता येणार नाही. दादा महाराष्ट्राचे पाटबंधारे आणि वीज मंत्री असताना त्यांनी पाणी प्रकल्पांचा पुरस्कार केला. अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली. परिणामी, राज्यात ठिकठिकाणी नवे पाणी प्रकल्प उभे राहिले. नद्यांवर मोठी धरणे बांधली गेली.  राज्यातील कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणावर ओलिताखाली येण्यास प्रारंभ झाला. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली (वारणा) प्रकल्प दादांच्या दूरदृष्टीतून साकार झाला. त्यासाठी दादांना फार मोठा राजकीय संघर्षही करावा लागला. मात्र पूर्वीचे कोयना धरण आणि दादांच्या पुढाकाराने उभे राहिलेले  चांदोली धरण यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्या बारमाही वाहत्या झाल्या. नंतर या दोन्ही धरणांच्या पाण्यावरच सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरणार्‍या उपसा जलसिंचन योजनांची आखणी करण्यात आली.

ताकारी-म्हैसाळ योजनेचे प्रवर्तक दादा

नदीकाठावरील गावांतील शेतीला पाणीपुरवठा संस्थांमुळे आणि धडक योजनांमुळे पाणी मिळू लागले. मात्र नदीच्या लाभक्षेत्रापासून खूप दूर असलेल्या शेतीचे काय; असा प्रश्‍न निर्माण झाला होता. पाणी मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी निराश झाले होते. वसंतरावदादांनी उपसा जलसिंचन योजनांचा उपाय त्यासाठी शोधला. यापूर्वी धडक योजनांचा अनुभव होताच. त्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणावर अशा उपसा जलसिंचन योजना सुरू केल्या तर दुष्काळग्रस्त भागाला पाणी देता येणे शक्य होते.या विचारातूनच ताकारी योजनेचा जन्म झाला. नदीतील पाणी मोठ्या अश्‍वशक्तीच्या पंपांच्या मदतीने उपसून उचलायचे आणि ते पाटाने दुष्काळग्रस्त भागात पोहोचवायचे अशी क्रांतिकारक संकल्पना यामागे होती. अर्थात, त्यासाठी शासनाचा पुढाकार आणि मदतीची गरज होती. दादांनी त्यासाठी पुढाकार घेतला. परिणामी, ताकारी योजनेचा प्रारंभ झाला. तो अनुभव लक्षात घेऊन नंतर म्हैसाळ योजनेचा नारळ फोडण्यात आला. ताकारी आणि म्हैसाळ या दोन्ही योजनांमुळे गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचे रूप पालटते आहे. तेथील शेतकर्‍यांना दिलासा मिळतो आहे. त्या भागात कारखानदारी, शैक्षणिक विश्‍व विकसित होते आहे. त्याचे श्रेय वसंतरावदादांचे आहे. ताकारी-म्हैसाळ योजनांच्या धर्तीवरच नंतर टेंभू उपसा जलसिंचन योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर वाकुर्डे योजनेचा मुहूर्त झाला. मात्र, दादांच्या पुढाकाराने दुष्काळग्रस्त  भागाचे भाग्य पालटण्याची प्रक्रिया सुरू झाली ही वस्तुस्थिती आहे.  केवळ सांगली जिल्ह्यापुरतीच या योजनांची व्याप्ती आता मर्यादित राहिलेली नाही, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यापर्यंत कृष्णेचे पाणी जाऊ लागले आहे. केवळ अशक्यप्राय वाटणार्‍या या जलक्रांतीचे अग्रदूत वसंतरावदादा पाटील आहेत असे म्हटले पाहिजे.

शैक्षणिक क्रांतीचे उद्गाते

वसंतरावदादा पाटील किती व्यापक आणि दूरदृष्टीतून राज्याच्या हिताचा विचार करीत होते त्याचे उदाहरण म्हणजे राज्यात खुले झालेले तंत्र आणि वैद्यकीय शिक्षणाचे दालन. त्यापूर्वी त्यांनी ‘मुलींना मोफत शिक्षण’ हा निर्णय घेतला होताच. मात्र विनाअनुदानित अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्याचा त्यांचा निर्णय ऐतिहासिकच नव्हे; तर क्रांतिकारक होता. दादांनी विनाअनुदान तत्त्वावर  अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण संस्थांना मान्यता दिल्यामुळे बहुजन समाजातील गुणवान आणि होतरू मुला-मुलींसाठी उच्च शिक्षणाचा रस्ता खुला झाला. अशा विनाअनुदानित महाविद्यालयातून अनेक अभियंते शिक्षण घेऊन बाहेर पडले. परिणामी, महाराष्ट्रात औद्योगिक क्रांतीला गती मिळाली. साधारणपणे 1990 नंतर महाराष्ट्राची औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत जी  प्रगती झाली, त्यासाठी या अभियंत्यांचे योगदान मोठे आहे. त्यातूनच नंतर सायबर क्रांतीचा प्रारंभ झाला.

साभार : दैनिक पुढारी (http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/article-on-vasant-dada-patil/)

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*