आचार्य विनोबा भावे

आचार्य विनोबा भावे
विनायक नरहरी भावे (आचार्य विनोबा भावे) (सप्टेंबर ११, १८९५ – नोव्हेंबर १५, १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये ‘वैयक्तिक सत्याग्रह’ पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये ‘छोडो भारत’ आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.

सुरुवातीचे जीवन : –
त्यांचा जन्म ११ सप्टेंबर,१८९५ रोजी, गागोडे गाव, कुलाबा जिल्हा, महाराष्ट्र येथे एका धार्मिक कुटुंबात झाला. त्यांचे बालपण बडोदा येथे गेले. त्यांच्यावर लहानपणी भगवद्‌गीता, महाभारत, रामायण यांचा प्रभाव पडला. त्यांचे वडील नरहरी शंभूदास भावे आणि आई रघुमाईदेवी यांनी त्यांची मानसिक वृत्ती घडवली. त्यांच्या आठवणींमध्ये भावे म्हणतात “माझ्या मनाला आकार देण्यात आईएवढी दुसर्‍या कशाचीही भूमिका नाही.” १९२१ मध्ये वर्धा येथे सत्याग्रह आश्रमाची एक शाखा निघाली, तेव्हा तिचे नेतृत्व गांधीजींनी विनोबावर सोपवले होते. व्यासंग आणि आचार शुद्धता यामुळे विनोबांना ‘आचार्य’ ही पदवी देण्यात आली. गांधीकुलाचे ते आचार्य होते. विनोबा हे गांधीजींचे अध्यामिक वारसदार होते.

स्वातंत्र्य लढा : –
ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींसोबत होते. स्वातंत्र्य लढ्यातील सहभागाबद्दल सन १९३२मध्ये त्यांना तुरुंगवास घडला.
संत विनोबा भावे यांनी आपले सारे जीवन दुस-याची सेवा करण्यात घालवले आणि भारतीय समाजाला सुसंस्कारांचा उपदेश दिला. बालपणात त्यांना त्यांचे माता-पिता विनायक नावाने बोलावत असत. परंतु महात्मा गांधींनी एकदा त्यांच्या वडिलांना पत्र लिहिले. त्यात त्यांच्यासाठी विनोबा शब्दाचा वापर केला. तेव्हापासून सर्व लोक त्यांना विनोबा भावे म्हणू लागले. विनोबाला सेवा, त्याग, सौहार्द हे संस्कार आपल्या आईकडून मिळाले. असाच एक प्रसंग आहे. एकदा विनोबाच्या शेजारीच राहणारा एक जण आजारी पडला होता. अशा कठीण परिस्थितीमध्ये विनोबाच्या आईने शेजाºयांना सहकार्य केले. ती आपल्या घरी जेवण बनवल्यानंतर शेजा-याच्या घरी जाऊन जेवण करून द्यायची आणि आजारी व्यक्तीची सेवाही करायची. एकदा विनोबाने आपल्या आईला विचारले, आई, तू किती मतलबी आहेस, स्वत:च्या घरचे जेवण आधी बनवतेस आणि नंतर शेजा-याचे जेवण तयार करतेस. आईने उत्तर दिले. तुला समजत नाही. विनोबा, शेजाºयाचे जेवण आधी बनवले तर ते थंड होईल. त्यामुळे मी त्यांचे जेवण नंतर बनवते. दुसºयाला संकटाच्या वेळी सहकार्य करण्याचा हा भाव विनोबांनी नेहमीसाठी सांभाळून ठेवला आणि त्यांचे संपूर्ण जीवन याच भावाचे प्रत्यक्ष उदाहरण बनले. तात्पर्य, संकटाच्या वेळी करण्यात येणारे सहकार्य हे एक शिकवण बनते. त्यामुळे लहान मुलांवर संस्कार करायला पाहिजेत, जेणेकरून त्यांच्या आचरणातून समाज घडेल.
त्यांना सांसारिक मोहापासून मुक्त होऊन अध्यात्माकडे वळायचे होते आणि आपले आयुष्य देशसेवेसाठीही वाहून घ्यायचे होते. हर तर्‍हेच्या बंधनातून मुक्त होऊन समाजाची सेवा करण्यासाठी अन्य कोणत्याही मार्गाकडे मन आकर्षित होऊ नये यासाठी त्यांनी आपली सगळी शैक्षणिक प्रमाणपत्रे चुलीत जाळून टाकली. इंटरची परीक्षा देण्यासाठी ते बडोद्याहून मुंबईला जाण्यासाठी निघाले खरे परंतु वाटेत सुरत स्टेशनवर ते उतरले व तेथून भुसावळमार्गे काशीला गेले. काशीला त्यांनी एका शाळेत नाममात्र वेतनावर इंग्रजी शिकवायला सुरुवात केली.
त्यानंतर ते गांधीजींना भेटण्यासाठी अहमदाबादला गेले. गांधीजी त्यांचा साधेपणा, संयम आणि सेवाभाव पाहून प्रभावित झाले. त्यांनी विनोबाजींना अहमदाबादमधल्या आश्रमातच राहायला सांगितले. पुढील काळात अहमदाबादेतील आश्रमातून ते एका वर्षाची सुट्टी घेऊन वाईला गेले. तेथे त्यांनी प्राज्ञ पाठशाळेत राहून धार्मिक संस्कृत ग्रंथांचा, वैदिक संस्कृतीचा अभ्यास केला.
१९२१ साली ते आपल्या काही सहकार्‍यांसोबत वर्ध्याला जाऊन पोहोचले. तेथे त्यांनी सेठ जमनालाल बजाज यांच्या साहाय्याने सत्याग्रह-आश्रमाची स्थापना केली.  जमनालाल बजाजांनी विनोबाजींना आपले गुरू मानले होते. या आश्रमात प्रवेश करण्यासाठी लिंग, जात, धर्माचे कोणतेच बंधन नव्हते. विनोबाजींनी वर्ध्याजवळील पवनार येथे ‘परमधाम’ आश्रमाची स्थापना केली. येथे शेती, ग्रामोद्योग व ग्रामसफाई याबाबत प्रयोग केले जात असत.
स्वातंत्र्यलढ्यात १९३२ साली त्यांना अटक झाली. धुळे येथील जेलमध्ये त्यांनी गीतेवर प्रवचन द्यायला सुरुवात केली. जेलमध्येच ही प्रवचने साने गुरुजींनी लिहून घेतली व पुढे ती ‘गीता प्रवचने’ म्हणून प्रकाशित करण्यात आली. ‘गीताई’ या ग्रंथाद्वारे विनोबाजींनी गीतेचा मराठी अनुवाद केला. (सर्वसाधारण वाचकासह आध्यात्मिक साधक व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनाच ‘गीताई’ आजही मार्गदर्शक ठरते आहे.) त्यांना गुजराती, बंगाली, उडिया, तेलुगू, कन्नड, मल्याळम्‌, उर्दू, अरबी, फ्रेंच आणि लॅटिन या भाषा अवगत होत्या. जीवनदृष्टी, अभंगव्रते, स्वराज्यशास्त्र असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले.
स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी ‘सर्वोदय समाजाची स्थापना केली. १९५१ साली त्यांची  अभूतपूर्व अशी ‘भूदान’ चळवळ सुरू झाली. या चळवळीचा प्रारंभ आंध्र प्रदेशातील नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातून झाला. यात त्यांनी श्रीमंत शेतकर्‍यांना आपल्या जमिनीचा काही हिस्सा भूमिहीन, हरिजन लोकांना दान करण्याचे आवाहन केले. हळूहळू त्यांनी चळवळीचा व्याप वाढवत नेला. आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामीळनाडू, कर्नाटक, ओरिसा व महाराष्ट्र या सर्व राज्यांत भूदान चळवळीसाठी विनोबाजी पायी फिरले. सर्व राज्यांत त्यांना प्रचंड, सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ग्रामदान, ग्रामराज्य, संपत्तीदान या संकल्पनांचाही त्यांनी चळवळीत अंतर्भाव केला. या अनोख्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी शांततापूर्ण मार्गाने असंतुलित जमीन मालकीचा प्रश्न सोडवण्यात यश मिळवले. या चळवळीतून हजारो एकर जमीन त्यांनी भूमिहीनांना बहाल केली. ‘सब भूमि गोपाल की’ हा या चळवळीचा नारा होता.  दरम्यान आपल्या आध्यात्मिक, मानवतावादी विचारांच्या साहाय्याने चंबळच्या खोर्‍यातील दरोडेखोरांचे मतपरिवर्तनही केले. राजकीय कार्य, भूदान चळवळ या गोष्टी एकीकडे करत असतानाच समांतरपणे, सातत्याने चालू असलेली प्रखर आध्यात्मिक साधना हे त्यांच्या जीवनाचे मुख्य वैशिष्ट्य होय.
आचार्य विनोबाजींनी ऋग्वेदास, वेदान्तसुधा, गुरूबोधसार, भागवतधर्म प्रसार इत्यादी ग्रंथांच्या माध्यमातून आपले आध्यात्मिक विचार मांडले. तसेच त्यांनी ‘मधुकर’, ‘महाराष्ट्र धर्म’ या नियतकालिकांतूनही  लेखन केले. धर्म, अध्यात्म, राजकारण, देशभक्ती, मानवतावाद, सत्याग्रह, अहिंसा इत्यादी विषयांवरील लेखन त्यांनी नियतकालिकांतून केले. त्यांचे लेखन आणि आध्यात्मिक व राजकीय कार्य यांमुळे त्यांना जयप्रकाश नारायण, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांसारखे अनुयायी लाभले.
अशा या प्रतिभावंत, निश्चयी महात्म्याचे १५ नोव्हेंबर १९८२ रोजी निधन झाले. १९८३ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ (मरणोत्तर) पुरस्काराने गौरविण्यात आले.

शब्दांकन मदत  : –
http://ganesh-suryavanshi.blogspot.in/2012/08/blog-post.html

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*