स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर: (२८ मे, इ.स. १८८३:भगूर – २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते.तीव्र बुद्धिमत्ता, आक्रमी व साहसी वृत्ती, हृदयातील मानव्य अन् सर्जनशील कवित्व लाभलेले हे बालक वयाच्या 10 व्या वर्षीच इतिहास आणि धर्मशास्त्रावरील जाडजूड पुस्तके वाचू लागले. 10 व्या वर्षी विनायकाने केलेल्या कविता तत्कालीन अग्रणी मराठी वृत्तपत्रात छापून येत असत. मात्र कवीच्या वयावर वाचकांचा विश्वासच बसत नसे. सावरकरांच्या घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. पारतंर्त्य, गुलामी, ब्रिटिश राजवट यांचा थोडाही उपद्रव सावरकरांपर्यंत पोहचला नव्हता. पण इतिहासाची पाने वाचत असताना सावरकरांच्या मनात राष्ट्रवाद आकार घेत होता. उन्मत्त ब्रिटिश सत्तेशी झगडणार्‍या क्रांतिकारकांनी सांडलेले रक्त सावरकरांना अस्वस्थ करू लागले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते . त्यांना स्वातंत्र्यवीर अशी उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक, पत्रकार, शिक्षक, चित्रपट दिग्दर्शक/निर्माते प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली.

सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकडे भाऊ होते. सावरकरांची आई ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगाला बळी पडले.सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकरबंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ घेतली.

मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरानी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले. इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ तिथे असताना त्यांनी मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकार्‍याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.
इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. ‘अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर’ हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.
राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११).मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.
खरोखर ज्ञानेश्वरांनंतर भिंत पुन्हा एकदा चालली:-
१९२१ साली सावरकरांची अंदमानमधून सुटका करण्यात आली त्यानंतर पुढे तीन वर्षे भारतामध्ये कैदेत होते. अखेर ६ जून १९२४ रोजी इंग्रज सरकारने त्यांना मुक्त केले. परंतू रत्नागिरी सॊडून न जाण्याचा आदेश देण्यात आला. सावरकरजवळ जवळ १३ वर्षे रत्नागिरीत स्थनबद्ध हॊते. तिथेही अस्पृश्यता निवारणाचे खूप प्रयत्न केले. रत्नागिरीत अस्पृश्यांसाठी त्यांनी ‘पतित पावन’ मंदिर बाधले.
महान समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांनी सावरकरांचे समाजसुधारणेचेकाम पाहून खूप कौतुक केले, ते म्हणाले, ‘देवाने माझे उरलेले आयुष्य त्यांना द्यावे.’ सावरकर अतिषय कष्टप्रद आणि खडतर आयुष्य जगले. दम्यासारखा विकार, स्वातंत्र्यॊत्तर काळात झालेले आरॊप प्रत्यारॊप, आपल्या जीवलगांचा मृत्युअशा अनेक गॊष्टी सॊसायला लागुनही त्यांना ८३ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले, नक्कीच विठ्ठलजी शिंदेंसारख्या अनेकांच्या आशीर्वादाचेच ते फळ मानावे लागेल.

सावरकरांच्या अनंत कार्यात भाषाशुद्धिची चळवळ ही अत्यंत महत्वाची मानावी लागेल. आज मराठी भाषेत प्रचलित असलेल्या अर्थसंकल्प, चित्रपट, गणसंख्या, दूरध्वनी, सेवा निवृत्त, शिरगणना,इ. अनेक शब्दांचे जनक सावरकर आहेत.स्थानबद्धतेतून मुक्तता झाल्यावर १९३७ ते १९४३ अशी सहा वर्षे सलग त्यांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. सावरकरांनी त्यांची हिंदूराष्ट्राची संकल्पना मांडली. त्यांनी ‘हिंदूत्व हेच राष्ट्रीयत्व’ असण्याची सिंहगर्जना केली. सावरकरांनीहिंदू या शब्दाची जी व्याख्या केली ती अशी,

आसिंधू सिंधू पर्यन्ता यस्य भारत भूमिका ।
पितृभूः पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिती स्मृतः ॥

हिंदुस्थानला १५ ऑगस्ट १९४७ रॊजी स्वातंत्र्य मिळाले. सावरकरांचा स्वातंत्र्यानंतरचा कालखंडही अनेक चांगल्या वाईट घटनांनी भरलेला आहे. त्यांचा अनेक ठिकाणी सन्मान करण्यात आला, पुणे विद्यापीठाने डी.लिट. ही सन्मान्य पदवीदिली. अनेक ठिकाणी जाहीर सत्कार करण्यात आले. परंतु त्यांचे वडीलबंधू बाबाराव सावरकर यांचे १९४५ साली, लहान बंधू बाळ सावरकर यांचे १९४९ साली, पत्नी यमुनाबाई यांचे १९६३ साली झालेले निधन त्यांना फार दुःख देवून गेले.मातृभूमीच्या चरणी सर्व कुटंबच देशसेवेसाठी समर्पित झाल्याचे इतिहासात दुसरे उदाहरण नाही.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे काय माहिती आहे? सावरकर म्हणजे साक्षात धगधगते यज्ञकुंड. सूर्याची उबदार प्रखरता, वाऱ्याचा वेग, खडकाने हेवा करावा अशी कठोरता आणि प्रत्यक्ष बृहस्पतीने शिष्यत्व पत्करावे अशी बुद्धीची प्रगल्भता म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर पेटलेले अग्निकुंडच उभे राहते, त्यांच्या लिहिलेल्या रचना स्मरतात आणि त्या रचनेतील प्रत्येक शब्द त्या यज्ञकुंडात पेटलेल्या ज्वाळेसारखे मनात धगधगत राहतात.

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला

मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला।।धृ।।

अट्टाहास करित जईं धर्मधारणीं

मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं

अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो

भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो

खुळा रिपू।तया स्वयें

मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये।।१।।

लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला

नम्रदाससम चाटिल तो पदांगुला

कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी

हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली

आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें

यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते

हलाहल।त्रिनेत्र तो

मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो।।२।।

त्यांना भिऊन पळू इच्छिणाऱ्या कालसार्पाच्या फण्यावर तात्याराव सावरकर नामक मृत्युंजय नेहमीच तांडव करताना दिसतो. मृत्यूला भ्याड म्हणणारे, “हे मृत्यू ज्या प्रमाणे शंकराने हलाहल विष प्राशन केले तद्वत तुला तुझ्या सैन्यासकट गिळून,जिरवून दाखवेल!” असे उलट मृत्युलाच आव्हान देणारा हा अवलिया विरळाच होय. सावरकरांचा प्रत्येक शब्द म्हणजे वेदच. त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक ओळीत साक्षात सरस्वती आणि रणचंडिका उभयता एकाच वेळी वास करतात. त्यांच्या घरात असलेल्या अष्ट्भुजादेवीलाही हे ज्ञात आहे. जेव्हा बाल विनायक तिच्यासमोर बसून प्रतिज्ञा घेत होता कि “हे माते, या माझ्या परमपुज्य मातृभूमीला परदास्याच्या शृंखलेतून मुक्त करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून, शत्रूला मारिता मारिता मरेतो झुंजेन!” तेव्हा तिच्याही मुठी कदाचित वळल्या असतील. तात्यारावांचे केवळ वक्तृत्वच नव्हे तर कर्तृत्वही राष्ट्रकार्यार्थ मातृभूमी चरणी वाहिले होते. १९०५ साली पुण्यात त्यांनी एक पराक्रम केला. त्यांनी परदेशी कापडाची अवघ्या पुण्यातून वाजत गाजत मिरवणूक काढली आणि शेवटी मुठा नदी काठी त्या कापडाची होळी केली. इंग्रज सरकारला उघड उघड जहाल विरोध करण्याचे धाडस प्रथमच दाखवले गेले. (ह्या परदेशी कापडाच्या होळीची त्या वेळी मवाळ आणि स्वयंघोषित अहिंसावाद्यांनी अवहेलना केली होती पण त्यांनीच १९२० च्या सुमारास त्यांनीही हेच धोरण अवलंबले आणि १९०५ सालच्या या तथाकथित हिंसक घटनेला १९२० अहिंसक मानण्यात आले.)

आत्मसमर्पण करण्याचा निश्चय करून सावरकरांनी अन्न घेण्याचे सोडले. शेवटच्या २० दिवसात तर पाण्याशिवाय त्यांनी काहीही घेतले नाही. अखेर २६ फेब्रुवारी १९६६ ला दुपारी ११वा.३० मिनिटांनी त्यांनी देह ठेवला.एकाच वाक्यातत्यांच्याबद्दल बॊलायचे झाल्यास ‘झाले बहु, हॊतीलही बहु पण यासम हाच!’ या समर्थ शब्दातच त्यांचे वर्णन करावे लागेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*