७ मार्च – तुकाराम बीज (Tukaram Maharaj)

पुण्याजवळ देहू येथे मोरे कुळातील आंबिले घराण्यात वडील बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई यांचे पोटी तुकाराम महाराजांचा जन्म झाला तो दिवस होता माघ शु. ५ शके १५३०. त्यांचा पिढीजात व्यवसाय वाण्याचा होता. तसेच या घराण्याकडे देहू गावाची महाजनकीही होती. या घराण्याचे मूळपुरुष विश्वंभर (इ. स. चे चौदावे शतक) हे विठ्ठलाचे उपासक होते, त्याने आपल्या घराजवळच विठ्ठलाचे मंदिर बांधले होते. त्यामुळे विश्वंभरापासून बोल्होबापर्यंत विठ्ठलभक्तीचा वारसा त्या घरात अविच्छिन्न चालत आला होता.
अशा भक्तियुक्त वातावरणात वाढलेल्या तुकारामांच्या मनावर बाळपणापासूनच शुभ संस्कार घडले. ‘विठ्ठल कुळीचे दैवत’ किंवा ‘पंढरीची वारी आहे माझे घरीं’ अशा उक्तींतून या परंपरागत संस्कारांचा तुकाराम महाराजांनी अभिमानाने उल्लेख केला आहे. ‘शुद्ध बीजापोटीं । फळें रसाळ गोमटीं’ हे त्याचे वचन त्यांच्या बाबतीत पूर्णपणे लागू पडते. महाजनकीच्या वृत्तीमुळे लिहिणे व वाचणे ते लहानपणीच शिकले. संस्कृताचाही परिचय करून घेतला होता. कथा-कीर्तनांतून आणि भजनांतून सतत कानी येणा-या संतवाणीने ते बहुश्रुत बनले होते. सदाचाराची बैठक ढळू न देता व्यवहार कसा करावा, हे त्यांना घरीच शिकायला मिळाले होते.
इ. स. १६३० च्या सुमारास सर्वत्र मोठा दुष्काळ पडला आणि लोकांची दुरवस्था झाली. या परिस्थितीत तुकारामाचे मन अंतर्मुख बनू लागले. त्याचे भक्तिसंस्कार जागे झाले आणि ‘विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुस-यांचे काज’ या निश्चयाने भक्तिसुख अनुभविण्यासाठी त्याने घरचे विठ्ठलमंदिर दुरुस्त केले. या विपरीत काळात वित्त व जीवित यांची असारता प्रत्ययाला आल्यामुळे त्याची वृत्ती संसारातून मुरडली आणि विठ्ठलचरणी स्थिरावू लागली. पुढे मोक्षाची इच्छा तीव्र झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी देहूजवळच्या भामनाथ पर्वतावरील एकांतात ईश्वरसाक्षात्कारासाठी निर्वाण मांडले. तिथे पंधरा दिवसपर्यंत अखंड एकाग्रतेने नामस्मरण केल्यानंतर त्यांना ‘दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका म्हणे’ अशा प्रकारचा दिव्य अनुभव प्राप्त झाला. या एकांताताली चिंतनाच्या काळात त्यांनी ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, नामदेव व एकनाथ यांच्या अभंगगाथा आणि इतर अनेक संतांची वचने यांचा सखोल अभ्यास केला, या स्थितीत पुनश्च धनाचा मोह उत्पन्न होऊ नये, म्हणून त्याने निग्रहपूर्वक आपल्या सावकारीच्या सर्व वह्या इंद्रायणीत बुडवून टाकल्या.
त्या वेळी छ. शिवाजी महाराजांचे स्वराज्य-प्रयत्न नुकतेच सुरू झाले होते. साधुसंतांविषयी स्वभावतःच प्रीती बाळगणा-या महाराजांनी तुकाराम महाराजांचेही दर्शन घेतले व मागाहून भेटीदाखल बरेच द्रव्य त्याच्या घरी पाठविले. परंतु त्या निरिच्छ व निर्लोभ संताने ते द्रव्य जसेच्या तसे परत पाठविले. सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी लोकांच्या मनातील अविवेकाची काजळी झटकण्यासाठी लोकांना नाना प्रकारे उपदेश केला. ‘बुडती हे जन देखवेना डोळां’ अशी तळमळ त्याने अनेकवार व्यक्त केली आहे. या तळमळीतूनच कधी मातेच्या ममतेने, तर कधी पित्याच्या कठोरतेने लोकांना सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड संत कवी होते. वेदान्तासारखा क्लिष्ट विषय तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे. आपले वाङ्मयधन हे लोकधानाच्या पदवीला नेऊन पोचविण्याचे भाग्य तुकाराम महाराजांना विशेष लाभलेले आहे. तुकारामांची अभंगवाणी ही गेल्या तीनशे वर्षांच्या काळात महाराष्ट्रवाणीचा एक अविभाज्य घटक बनलेली आहे.
तुकारामांच्या अभंगांतील किती तरी चरण, अर्धचरण, शब्दप्रयोग, कल्पना व भाषाप्रयोग मराठी माणसाच्या हरघडीच्या बोली भाषेत अवतरले आहेत. मोजक्या शब्दांत केवळ खूपसा अर्थ, खरेतर विश्वव्यापक अनुभव व्यक्त करण्याची शक्ती तर त्या वाणीमध्ये आहेच – शिवाय छंदोबद्ध असल्यामुळे तिला सुभाषितासारखी तालबद्धताही प्राप्त झाली आहे. मराठी भक्तिपरंपरेत आणि कविमंडळातही तुकारामाचे स्थान अनन्यसाधारण आहे. ‘अणुरणीया थोकडा’ म्हणणारे तुकाराम महाराज विवेकबळाने आकाशाएवढे बनले आणि ज्ञानेश्वरांनी ज्याचा पाया रचला, त्या भागवतधर्म मंदिरावरचा कळस होऊन शोभत राहिले व राहतील. शके १५७१ फाल्गुन वद्य २, चे दिवशी सदेह वैकुंठाला जाण्याचे भाग्य या थोर संताला लाभले.

संदर्भ साभार :-https://www.facebook.com/groups/376798842459797/permalink/546669388806074/

Leave a Reply

Your email address will not be published.


*