‘पुणे फेस्टिव्हल’ २५ ऑगस्टपासून

संगीत, नृत्य, कला, गायन, वादन, क्रीडा संस्कृती यांचा मिलाफ असलेला २९ वा पुणे फेस्टिव्हल २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान गणेश कला क्रीडा रंगमंच येथे रंगणार आहे. ज्येष्ठ अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा व दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते एक सप्टेंबरला महोत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने दिला जाणारा पुणे फेस्टिव्हल पुरस्कार यंदा अभिनेते शेखर सुमन, क्रिकेटपटू केदार जाधव, दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि आयटी तज्ज्ञ आनंद खांडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
एक सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महापौर मुक्ता टिळक, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार व ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अभिनेता विवेक ओबेरॉय, रति अग्निहोत्री, कार्तिक आर्यन, नेहा शर्मा आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक सुरेश कलमाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, डॉ.सतिश देसाई आदी या वेळी उपस्थित होते.
दर वर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवात नृत्य, संगीत, नाट्य, आणि क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये ऑल इंडिया उर्दू मुशायरा, उगवते तारे, इंद्रधनू , शास्त्रीय संगीत, नृत्य, सुगमसंगीत, मराठी कवी संमेलन, हास्योत्सव, एकपात्री, महिला महोत्सव, पेंटिंग प्रदर्शन, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, केरळ महोत्सव, मराठी नाटके अशा विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद पुणेकरांना घेण्यात येणार आहे. गणेश कला क्रिडा रंगमंच, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे हे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय फेस्टिव्हलमध्ये गोल्फ, मल्लखांब, बॉक्सिंग, कुस्ती या खेळांच्या स्पर्धाही रंगणार आहेत.
गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उद्घाटन समारंभात मानाचा पहिला गणपती कसबा गणपती मंडळ, केसरी गणेशोत्सव, भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
———————

Thanks : MaharashtraTimes

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*