बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्याची परवानगी द्या; दिग्दर्शकाची हायकोर्टात याचिका

मुंबईसह राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये केवळ तिथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांची सक्ती नको. तर घरुन किंवा बाहेरुन आणलेले खाद्यपदार्थ नेण्याची परवानगी असावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रेक्षकांनी घरुन किंवा बाहेरुन आणलेले पदार्थ चित्रपटगृहांमध्ये नेता येणार नाहीत, असा कोणताही कायदा अस्तित्वात नसल्याचे चित्रपट दिग्दर्शक जैनेंद्र बक्षी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. उलट महाराष्ट्र चित्रपट नियमन कायद्याचा विचार केल्यास चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ विकण्यास बंदी आहे, याकडेही बक्षी यांनी लक्ष वेधले आहे.

‘अनेकदा चित्रपट पाहताना खाद्यपदार्थ विकणारे लोक येतात. चित्रपट सुरु असताना, मध्यंतराच्यावेळी त्यांच्याकडून सर्रास खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. बहुतांश चित्रपटगृहांमध्ये हा प्रकार पाहायला मिळतो. मात्र राज्याच्या चित्रपट नियमन कायद्यांतर्गत असे करण्यास बंदी आहे,’ असे जैनेंद्र बक्षी यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. ‘अनेक चित्रपटगृहांमध्ये बाहेरुन आणलेले खाद्यपदार्थ नेण्याची परवानगी दिली जात नाही. याचा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसतो. वैद्यकीय कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांना बाहेरील अन्नपदार्थ खाता येत नाहीत आणि चित्रपटगृहांजवळील स्टॉल्सवर जंक फूडचे प्रमाण जास्त असते. यामुळे वृद्ध व्यक्तींची मोठी अडचण होते,’ असे बक्षींनी त्यांच्या याचिकेत नमूद केले आहे.

घरुन किंवा बाहेरुन आणलेले खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्यास मनाई करणे हे मुलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, असे बक्षींनी याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणी राज्य सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. बक्षी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. चित्रपटगृहांमध्ये घरुन किंवा बाहेरुन आणलेले खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची परवानगी दिल्यास लोकांना होणारा मनस्ताप थांबेल. याशिवाय चित्रपटगृहांमध्ये मिळणारे खाद्यपदार्थ महाग असल्याने प्रेक्षकांच्या पैशांची बचतदेखील होईल.

News: Loksatta

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*