दैनंदिन व्यवहारात मराठीची खिचडी

marathi-mh-marathi

मराठीचे स्थान धोक्‍यात आले आहे?

सांस्कृतिक राजधानी समजले जाणारे पुणे शहर हे बहुविविधतेने नटलेले आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने देशाच्या वेगवेगळ्या भागातील लोक पुण्यात राहतात. त्यामुळे शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा आपल्याला ऐकायला मिळते. मात्र, महाराष्ट्रीयनच नव्हे, तर अस्सल पुणेकरांच्या भाषेवरही आता प्रचंड परिणाम झाला आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सर्वत्रच ‘भाषेची खिचडी‘ अनुभवायला मिळत आहे. हिंदी-इंग्रजीत बोलणे ही तर ‘स्टेट्‌स‘ची गोष्ट बनली आहे. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहारात मराठीचे स्वरूप कसे झाले आहे? याचा वेध घेतला आहे, ‘सकाळ‘च्या प्रतिनिधींनी मातृभाषा दिनाच्या निमित्ताने.
*****
मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी येथे क्लिक करामॉल
ग्राहक : या वस्तूवर काही डिस्काउंट द्याल का?
कर्मचारी : नो मॅम, नो डिस्काउंट.
ग्राहक : इट्‌स नॉट गुड. इतर ठिकाणी डिस्काउंट सुरू आहे.
कर्मचारी : मॅम, आमच्या पॉलिसीचा प्रश्‍न आहे.
ग्राहक : तो फिर जाने दो. हम दूसरी जगह लेते हैं ।असे संवाद गरवारे महाविद्यालयाजवळील ‘मॉल‘मध्ये ऐकायला मिळाले. या मॉलमध्ये येणारी तरुणाई आणि ग्राहक वर्ग हा इंग्रजी व मराठी बोलणारा असल्याने येथे दोन्ही भाषांची सरमिसळ ऐकायला मिळाली. मॉलमधील कर्मचाऱ्यांची मातृभाषा ही मराठी असली तरी, येथे येणारे निम्म्याहून अधिक ग्राहक इंग्रजीमध्ये संवाद साधणारे असतात. त्यामुळे त्यांनाही इंग्लिश-हिंदीमध्येच बोलावे लागते. ही भाषा ऐकून मराठी ग्राहकसुद्धा हिंदी-इंग्रजी भाषेत संवाद साधताना दिसले. मॉलमधील कर्मचारी ग्राहकांना सोईस्कर पडेल त्या भाषेत संवाद साधत होते. येथे येणाऱ्यांमध्ये तरुणाईचे प्रमाण सर्वाधिक होते. तेही इंग्रजीत बोलताना दिसले. एखादी वस्तू खरेदी करण्यापासून त्याची पावती घेण्यापर्यंत मराठी-इंग्रजी भाषा एकत्र करून तरुणाई संवाद साधत होती. एकप्रकारे भाषेची खिचडीच येथे ऐकायला मिळाली.
*****

हॉंगकॉग लेन, ‘गुडलक‘
पहिली मुलगी : भैया, ये स्क्रीनगार्ड और मोबाईल कव्हर का प्राइस कम कर दो ना.
विक्रेता : अरे नहीं मॅडम, बराबर बताया है ।
मुलींमधला संवाद : अगं, हे खूप कॉस्टली वाटतंय. एवढी प्राइस वाटत नाही याची. पुढच्या शॉपमध्ये बघुयात.
विक्रेता : अहो मॅडम, हे स्वस्तात मस्त आहे; घ्या.

हा संवाद कानावर पडला हॉंगकॉग लेनमध्ये फेरफटका मारताना. विक्रेता व तरुणी या दोघांना मराठी भाषा येत होती. तरुणींची तर मातृभाषा मराठीच होती. तरीही त्यांनी मराठीत संवाद साधला नाही. अनेक वाक्‍यांमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर होता. विविध वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणांमध्ये अशी हिंदी, मराठी व इंग्रजी भाषेची सरमिसळ येथे अनुभवायला मिळाली. गुडलक हॉटेल आणि त्याच्या परिसरातील तरुणाईचा एक गट विविध विषयांवर चर्चा करताना दिसला. त्यांच्यात मराठीतून संवाद सुरू होता; परंतु यामध्ये अधूनमधून इंग्रजी शब्दांचा सर्रास वापर होत होता. “सही रे‘, “लय भारी‘, “चांगला ठोकला त्याला, काय हटके होता तो, अशी भाषासुद्धा ते वापरत होते. येथे उपस्थित असलेले ज्येष्ठ नागरिक मात्र मराठीतून बोलत होते.
*****

पंचतारांकित हॉटेल
एक पुणेकर हॉटेलच्या प्रतीक्षालयात बसून कर्मचाऱ्याकडून कॉफी मागवतात. पुणेकराने मराठीतून केलेल्या मागणीला अनुसरून जमेल तेवढी मराठी बोलत येथील कर्मचारी त्याला मराठीतूनच होकार देतो. थोड्या वेळात पुणेकराच्या पुढ्यात कॉफी हजर होते. “सर, आपली कॉफी. (चेहऱ्यावर हसू!) आपल्याला अजून काही हवंय सर?… पुणेकराने नकार दिल्यानंतर “ओके‘ हा एकच काय तो इंग्रजी शब्द या कर्मचाऱ्याच्या तोंडी ऐकायला मिळाला.
पंचतारांकित हॉटेल अर्थात खाद्यगृहांत फक्त इंग्रजी अन्‌ हिंदीच बोलली जाते, हा ‘गैरसमज‘ इथे सुरवातीला काहीसा दूर झाला. समोरील व्यक्ती कोणत्या भाषेत संवाद साधतेय, त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची पद्धत… हे वेगळेपणे इथे ठळकपणे दिसून येत होते. इंग्रजी, हिंदीबरोबरच काही प्रमाणात मराठीलाही महत्त्वाचे स्थान दिसत होते. मात्र महाराष्ट्रीयन असूनही अशा आलिशान हॉटेलमध्ये मराठी कसे बोलायचे, असा प्रश्‍न इथे येणाऱ्या अनेकांना पडला, हे आपापसांतील संवादावरून जाणवत होते.

“दिवसेंदिवस मराठी भाषा मागे पडत चालली आहे. हिंदी, इंग्रजी या भाषा ज्ञानभाषा, व्यवहारभाषा म्हणून पुढे आल्या आहेत. हे चित्र मराठी भाषेची दुरवस्था दर्शविणारे आहे. आपल्या प्रत्येकाच्या मनात, हृदयात मराठी भाषेप्रती ओलावा, आत्मीयता असायला हवी. ती वाढायला हवी. भाषाप्रेमातूनच मराठीला ऊर्जितावस्था येईल.‘‘
डॉ. अविनाश सांगोलेकर (मराठी विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

सौजन्य साभार : ई – सकाळ : http://www.esakal.com/Tiny.aspx?K=rPMFt

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*