‘अभिजात’ मराठी दृष्टिपथात

किमान येत्या १ मे रोजीच्या महाराष्ट्र दिनापर्यंत या निर्णयाची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे.

मराठी भाषेस अभिजात दर्जा देण्याच्या मागणीस विरोध करणारी याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळल्याने या मार्गातील अखेरचा अडथळा दूर होऊन हा दर्जा दृष्टिपथात आल्याचे मानले जात आहे. त्यामुळे किमान येत्या १ मे रोजीच्या महाराष्ट्र दिनापर्यंत या निर्णयाची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे.

मद्रास उच्च न्यायालयात याबाबत याचिका प्रलंबित असल्याने आम्ही मराठीच्या दर्जाचा प्रस्ताव संस्थगित ठेवला होता. पण न्यायालयाने अभिजात दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळल्याने आम्ही मराठीच्या प्रस्तावावरील धूळ झटकली आहे, अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. महेश शर्मा यांनी सोमवारी दिली. मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना लिहिलेल्या पत्रातही त्यांनी या माहितीला दुजोरा दिला.

मराठीला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव चार वर्षे रेंगाळला आहे. आतापर्यंत पाच मूहूर्ताची घोषणा झाली, पण पुढे काहीच झाले नाही. मराठीच्या प्राचीनत्वाचे आणि अभिजाततेचे पुरावे गोळा करण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष प्रा. रंगनाथ पठारे यांनी या विलंबाबद्दल फेसबुकवरूनच आपली नाराजी जाहीर केली होती. महाराष्ट्रातील खासदारांनी गेल्या चार वर्षांत हा प्रश्न वारंवार उपस्थित केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मध्यंतरी झालेल्या भेटीमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या मुद्दय़ाकडे त्यांचे लक्ष वेधले होते. तर शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी तो मुद्दा नुकताच शून्य काळात मांडला होता. पण आर. गांधी या वकिलाने मद्रास उच्च न्यायालयामध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्यास विरोध करणारी याचिका दाखल केल्याने एप्रिल २०१५पासून केंद्रीय मंत्रिमंडळासमोर असलेला प्रस्ताव तसाच धूळ खात पडला होता. यासारख्या नाजूक आणि अस्मितेच्या मुद्दय़ावर पंतप्रधानांना नाहक कोर्टबाजी नको असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे न्यायालयाच्या निकालाची वाट पाहण्याचा निर्णय घेऊन हा प्रस्ताव पुन्हा सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठविला होता. पण मध्यंतरी मद्रास उच्च न्यायालयाने आर. गांधी यांचे सर्व मुद्दे फेटाळले. ‘प्रत्येक भाषा एक मंदीर आहे, जिथे ती बोलणाऱ्यांचा आत्मा असतो. ती अभिजात भाषा असेल, असे विद्वानांनी मान्य केले असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? तज्ज्ञांच्या अहवालामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही,’ असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

अभिजातचा फायदा काय?

मराठी ही जवळपास अकरा कोटी लोकांची, तसेच जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळी आणि ओडिया भाषांना आतापर्यंत अभिजात दर्जा मिळाला आहे. तो मिळाल्यानंतर केंद्राकडून भाषा संवर्धनासाठी एकरकमी शंभर कोटी रुपयांचा विशेष निधी तर मिळतोच; पण त्याचबरोबर त्या भाषेच्या साहित्यिकांना-अभ्यासकांना विविध सवलती देण्यासाठी, विद्यपीठांमध्ये अध्यासने स्थापन करण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी नियमितपणे मिळत असतो.

हुकलेले मुहूर्त.

  • २७ फेब्रुवारी २०१५ : जागतिक मराठीदिन
  • ४ ते ६ एप्रिल २०१५ : घुमान (पंजाब) साहित्य संमेलन
  • १ मे २०१५ : महाराष्ट्र दिन
  • २७ फेब्रुवारी २०१६ : जागतिक मराठी दिन
  • १ मे २०१६ : महाराष्ट्र दिन
  • १ मे २०१७ : …?

News Source : http://www.loksatta.com/desh-videsh-news/issue-of-elegance-status-to-marathi-1441221/

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*